कोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!
schedule24 Jul 26 person by visibility 33 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नीट पेपर फुटीप्रकरणी सरकारला जाब विचारण्यासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील लेखक, कवी, प्राध्यापक व शिक्षक मंडळी रस्त्यावर उतरत आहेत. ‘चला एकत्र येऊ या. जंतरमंतरवर लढणाऱ्या तरुणाईचे मनोबल वाढवण्यासाठी, लढ्याचा भाग बनण्यासाठी…’अशी साद घालत ही मंडळी शनिवारी (२५ जुलै २०२६)धरणे आंदोलन करणार आहेत. टाऊन हॉल नजीकच्या राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे दुपारी दोन वाजता हे आंदोलन होणार आहे.
‘भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाच्या भवितव्याच्यादृष्टीने ही बाब खूपच चिंताजनक आहे. गेल्या दहा बारा वर्षात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सरकारने सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या लेखक, कवी, कलावंत, शिक्षक, कार्यकर्ते, विद्यार्थी या साऱ्यांचाच आवाज दाबला आहे. त्यांची मुस्कटदाबी केली आहे. काहींना तर तुरुंगात सडवले आहे. त्यांच्या सृजनशीलतेचाच गळा दाबला जात आहे. जंतरमंतरवर देशभरातून उत्स्फुर्तपणे जमलेली ही तरुणाई म्हणजे सरकारच्या दडपशाहीला दिलेली प्रतिक्रिया आहे. चला तर मग तिचे मनोबल वाढवण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळावर एकत्र येऊया. तरुणाईचा हा आवाज अधिक बुलंद करूया...’या विचाराने ही सारी मंडळी शनिवारी एकवटत आहेत.
या आंदोलनात डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. माया पंडित, कॉम्रेड धनाजी गुरव, संपत देसाई, डॉ. मोहन पाटील, उदय नारकर, आनंद विंगकर, एकनाथ पाटील, कृष्णात खोत, डॉ. नितीन शिंदे, संजय बनसोडे, कृष्णात स्वाती, श्रीधर चैतन्य, अनमोल कोठडीया, प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोविंद काजरेकर, नामदेव माळी, कवी गोविंद पाटील, रफीक सूरज, श्यामसुंदर मिरजकर, महेश कराडकर, किरण गुरव, जयसिंग पाटील, सुभाष कोरे, चंद्रशेखर कांबळे, संतोष जगताप, पाटलोबा पाटील, दि.बा. पाटील, डॉ. राजीव चव्हाण, महेश पेडणेकर, राहुल कदम, चंद्रकांत बाबर, साहिल कबीर, सुधाकर सावंत, राहुल पवार, उमेश देसाई, संभाजी बापट, मनोज रणदिवे, प्रसाद पाटील, गौतम वर्धन, रवी राजमाने, अभिजित पाटील, बाळासाहेब कांबळे, अॅड. कृष्णा पाटील, कविता ननावरे, सुप्रिया आवरे, धनाजी घोरपडे, रमजान मुल्ला, शरद आजगेकर, विष्णू पावले, रंगा कांबळे, धर्मवीर पाटील, रविंद्र गुरव, विष्णू पावले, विक्रम वागरे,विक्रम राजवर्धन, कृष्णा भारतीय, प्रशांत नागावकर, डॉ नवनाथ शिंदे, विजय कांबळे, राजेंद्र कांबळे, डी के पाटील आदी सहभागी होणार आहेत.