शिक्षकांचा कोल्हापुरात शनिवारी मूक मोर्चा ! टीईटीचा विषय ऐरणीवर!!
schedule06 Nov 25 person by visibility 55 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात जो निर्णय दिला आहे तो निर्णय शिक्षकांच्या अस्तित्वाला धोका पोहोचणार आहे. तेव्हा टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका लवकरात लवकर दाखल करावी या मागणीकरिता शनिवारी 8 नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापुरात शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या मोर्चामध्ये 30हून अधिक शिक्षण संघटना व आठ हजारहून अधिक शिक्षक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षक नेते भरत रसाळे, दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे, सी.एम. गायकवाड, प्रसाद पाटील आदींनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत शनिवारी निघणाऱ्या मूक मोर्चा आंदोलनाची माहिती दिली. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांनी राज्यातील टीईटी परीक्षाबाबत राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे नागपूर येथे एक आक्टोंबर 2025 रोजी बैठक घेतली होती. टीईटी परीक्षेच्या संदर्भात लवकरच राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल अशी ग्वाही त्यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना दिले होते. मात्र अद्याप सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. शिक्षक म्हणून पंचवीस ते तीस वर्षे ज्यांनी काम केले आहे त्यांना परत टीईटी परीक्षा लागू करणे हे त्यांच्यावरती अन्याय करण्यासारखे आहे टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय हा शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम करणार आहे. टीईटी परीक्षा अनिवार्य केल्यामुळे अनेक शिक्षक मानसिक दडपणाखाली आहेत. तेव्हा सरसकट टीईटी परीक्षा अनिवार्य करणेचा निर्णय रद्द व्हावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली. शनिवारी निघणाऱ्या मोर्चामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. दुपारी एक वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात होईल. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग आहे. मोर्चामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत. शिक्षक हाती फलक घेऊन प्रशासन व सरकारचे लक्ष वेधणार आहेत. पत्रकार परिषदेला बबन केकरे, मनोज माळवदकर , श्वेता खांडेकर, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, सुनील पोवार, रणजीत सूर्यवंशी, मनोज रणदिवे, आर. डी पाटील, जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे मनोहर जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. शिक्षक संघ थोरात गट व समन्वय समितीच्यावतीने 24 नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात आंदोलन पुकारले आहे त्या आंदोलनात इतर संघटनानी सहभाग नोंदवला तर आठ तारखेला होणाऱ्या मूक मोर्चा आंदोलनात शिक्षक संघ थोरात गट सहभागी होईल असे त्यांनी स्पष्ट केले