तावडे हॉटेल कमानीचा धोकादायक भाग उतरविला, नवीन प्रवेशद्वारासाठी तीन कोटीचा निधी-राजेश क्षीरसागर
schedule16 Oct 25 person by visibility 57 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तावडे हॉटेल येथील स्वागत कमानीचा धोकादायक भाग महापालिकेने उतरविला आहे. तावडे हॉटेल कमानीच्या आतून गेलेली मुख्य विद्युत वाहिनीची केबल काढण्यात आली. दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमेत पाहणी केली. नवीन प्रवेशद्वारासाठी तीन कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
कमानीला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. महानगरपालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार धोकादायक असलेला भाग निष्कासीत करण्यात आला. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी भेट दिली. आमदार क्षीरसागर यांनी या ठिकाणी पाहणी करुन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. क्षीरसागर म्हणाले, ‘ कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता संपूर्ण कमान पूर्णपणे उतरवून घेणे आवश्यक आहे. येत्या दोन ते चार दिवसांमध्ये कमान उतरवून घेण्यात यावी. तसेच शहरात प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. कमानीच्या सुंदर आणि आकर्षक अशा डिझाईनसाठी डिझाईन स्पर्धा घ्याव्यात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारी, पुढील काळात वाढणाऱ्या वाहतुकीचा अभ्यास करून भव्य प्रवेशद्वाराचे डिझाईन करण्यात यावे. नवीन कामासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क केला . तीन कोटीचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. या पाहणी दरम्यान माजी नगरसेवक सुहास लटोरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, स्ट्रक्चरल ऑडिटर श्री.हडकर, अविनाश कामते यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते..