पॅकर्स क्लबतर्फे टी व्टेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
schedule15 Mar 24 person by visibility 426 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
पॅकर्स क्रिकेट क्लबच्यावतीने महापालिकेच्या शास्त्रीनगर मैदानावर खुल्या निमंत्रीतांच्या टी व्टेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २४ मार्च या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाणार आहे. स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई, पुणे येथील एकूण सहा संघ सहभागी होणार असून यातून रणजी , विद्यापीठ दर्जाच्या स्पर्धा गाजविणाऱ्या नामवंत खेळाडूंचा सहभाग असणार आहे. अशी माहिती संयोजक विजय सोमाणी, मदन शेळके, नंदकुमार बामणे, संजय कदम, राजू सोमणी, हेमंत कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पॅकर्स क्रिकेट क्लब क्रिकेट खेळाच्या विकासासाठी १९७७ पासून गेली ४७ वर्षे राज्यभर सक्रिय आहे. क्लबमध्ये महाराष्ट्र, गोवा, मुंबई रणजी संघाकडून खेळणारे कै. शशी घोरपडे, विराज निंबाळकर, ध्रुव केळवकर, रमेश हजारे, मिलींद कुलकर्णी, उमेश गोटखिंडीकर, सचिन उपाध्ये , संग्राम अतितकर असे अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत. पॅकर्स तर्फे आयोजित स्पर्धांमध्ये संजय मांजरेकर, चंद्रकांत पंडीत, व्यंकटपती राजू, सुरेंद्र भावे असे अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत.
स्पर्धेत सेंट्रल जीएसटी पुणे, पुनीत बालन-केदार जाधव ॲकॅडमी पुणे, पय्याडे स्पोर्ट्स क्लब मुंबई, जैन इरिगेशन ॲकॅडमी जळगांव, लाँग लाईफ कोल्हापूर व केडीसीए कोल्हापूर या संघांचा सहभाग असणार आहे. विजेता संघास क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर स्मरणार्थ फिरता चषक व एक लाख ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. उपविजेता संघास मुरलीधर सोमाणी स्मरणार्थ एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांना कै. धैर्यशील निंबाळकर स्मरणार्थ प्रत्येकी पाच हजार रुपये तर प्रत्येक सामन्याच्या सामनावीरास तीन हजार रुपये, सर्वाधिक षटकार व चौकारासाठी फलंदाजास प्रत्येकी तीन हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यंदाच्या स्पर्धेसाठीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव व विश्लेषक सुनंदन लेले यांची उपस्थिती असणार आहे. स्पर्धेसाठीची विकेट बीसीसीआयचे ग्राऊंड तज्ज्ञ रमेश म्हामुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले जात आहे. पांढरा बॉल व रंगीत किट अशा स्वरुपाची ही स्पर्धा असून याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.