अजब कारभार, इस्टेट विभागालाच महापालिकेच्या मालकीच्या जागांची माहिती नाही : कोल्हापूर नेक्स्ट आंदोलनाच्या पावित्र्यात
schedule22 Aug 24 person by visibility 441 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरात महापालिकेच्या मालकीच्या ठिकठिकाणी जागा आहेत. मात्र धक्कादायक प्रकार म्हणजे, या जागांची एकूण संख्या, जागाा किती यासंबंधीची माहितीच महापालिकेच्या इस्टेट विभागप्रमुखांना नाही. कोल्हापूर नेक्स्ट ंसंघटनेच्या शिष्टमंडळाने यासंबंधी अधिकाऱ्यावर प्रश्नांचा भडिमार केला, पण अधिकाऱ्यांना संयुक्तिक उत्तर देता आले नाही.
या संघटनेच्या शिष्टमंडळाची, गुरुवारी महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांच्याशी शहरातील अतिक्रमणासंबंधी चर्चा झाली. कोल्हापूर शहरातील अतिक्रमण पंधरा दिवसात हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेचे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण यांनी दिला. बैठकीच्या प्रारंभी माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी इस्टेट विभागाच्या प्रमुखांना शहरातील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांची संख्या विचारली. त्यांना याचे संयुक्तिक उत्तर देता आले नाही. त्यामुळे बैठकीच्या सुरुवातीलाच कार्यकर्ते संतप्त झाले.
महानगरपालिकेकडे असलेल्या मोकळ्या जागांची अतिक्रमणांमुळे होणारी असुरक्षितता, महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या पडून असलेल्या गाळ्यांमुळे आणि अन्य मिळकतींमुळे होणारे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान, शहरात सर्वच प्रमुख रस्ते आणि चौकात तसेच गल्लोगल्ली प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले अतिक्रमण आणि बेकायदेशीर टपऱ्या, रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगमुळे होणारी वाहन कोंडी यावरून माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे पाटील, सुनील पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रा. व्हटकर यांनी जवाहर नगर परिसरात महानगरपालिकेच्या मोठ्या मोकळ्या जागेवर एका माजी नगरसेवकाने उभे केलेल्या व्यवसायांबाबत गेली तीन वर्षे महानगरपालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. अनिल पाचगावकर यांनी नेहरूनगर परिसरात एका माजी पदाधिकाऱ्यांने बेकायदेशीरपणे वसवलेल्या 80 घरांचा माहिती अधिकारातील दाखला देऊन महानगरपालिका अधिकारी कारवाई करत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. रणजीत पाटील यांनी अतिक्रमणावर कारवाई करायची सोडून नियमित कर भरणाऱ्या गॅरेजला सील केल्याचे प्रकरण उपायुक्तांसमोर मांडले. संदीप पाटील यांनी जरगनगर मधली मोकळी जागा महानगरपालिका ताब्यात घेत नसल्यामुळे होणारी खेळाडूंची अडचण निदर्शनास आणून दिली. विनय खोपडे यांनी देवकर पाणंद परिसरातील सेट बॅक मधील बांधकामे दृष्टोत्पत्तीस आणून दिली तर ओंकार गोसावी यांनी महाद्वार रोड व ताराबाई रोडवरील परप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे होणाऱ्या कोंडी बद्दल प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना खडसावले.
अजित ठाणेकर यांनी वारंवार तक्रार करूनही वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या विनापरवाना लॉजिंगमध्ये काही माजी नगरसेवक आणि आजी-माजी अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध गुंतल्याचा आरोप केला. उपायुक्तांनी सर्वच प्रकरणे गंभीर असून यात वैयक्तिक लक्ष घालू आणि लवकरात लवकर कोल्हापूर अतिक्रमण मुक्त करू अशी ग्वाही कार्यकर्ते नागरिकांना दिली. यावेळी इस्टेट व अतिक्रमण विभाग प्रमुख साळोखे, परवाना अधीक्षक राम काटकर, रवींद्र पोवार या अधिकाऱ्यांसह गणपत गायकवाड, वसंत रोकडे, सुरज धनवडे, ऋतुराज नढाळे उपस्थित होते.