लवकरच आचारसंहिता, पहिल्यांदा नगरपालिका, मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका –हसन मुश्रीफांचा अंदाज
schedule01 Nov 25 person by visibility 178 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘लवकरच आचारसंहिता सुरू होईल पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका लागतील आणि नंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या असा अंदाज आहे. या सगळ्या निवडणुकांमधील इच्छुकांच्या भूमिका मी मुलाखतीद्वारे प्रत्यक्ष जाणून घेईन. उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. उमेदवारी न मिळालेल्यांना कशा पद्धतीने मानसन्मान द्यायचा यासाठी मी विचार करेन. कारण, महायुती म्हणून आपण सरकारमध्ये सहभागी आहोत. मित्रपक्षांना सोबत घेऊनच ही निवडणूक लढवावी लागेल.’असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
मंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, पदवीधर मतदार संघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, ‘महायुतीमध्ये भाजपा हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कागलसह गडहिंग्लज, मुरगुड या नगर परिषदांवर कागल विधानसभा मतदारसंघातील आठ जिल्हा परिषद मतदार संघांसह १६ पंचायत समिती मतदार संघांवर आणि पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आणि पर्यायाने महायुतीचा झेंडा फडकविण्याची शपथ घेऊया, असेही ती म्हणाले.
राष्ट्रवादीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी स्वागत केले. केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने यांनी प्रास्ताविक केले. विशाल बेलवळेकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी आभार मानले. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील - गिजवणेकर, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, प्रकाश गाडेकर, सुखदेव येरुडकर, शशिकांत खोत, विश्वजीतसिंह पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, रवींद्र पाटील, आर व्ही पाटील, प्रवीणसिंह भोसले, बाळासाहेब देसाई - मंनचेकर दिनकर कोतेकर, जे डी मुसळे, दत्ता पाटील - केनवडेकर, दिगंबर परीट, जीवनराव शिंदे, बाळासाहेब तुरंबे, राजेंद्र माने, रणजीत सूर्यवंशी, संजय चितारी, संजय फराकटे, सदानंद पाटील आदीप्रमुख उपस्थित होते.