रेशन बचावसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
schedule20 Sep 22 person by visibility 814 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
“रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शिवसेना झिंदाबाद, रेशनवर गहू तांदूळ मिळालेच पाहिजे”अशा घोषणा देत रेशन बचावसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.जिल्हाधिकरी राहुल रेखावार यांना मागण्यांचे निवेदन दिले. कार्यकर्त्यांनी मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
केंद्र व राज्य सरकारकडून ग्राहकांना स्वेच्छेने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याची सक्ती केली जात आहे. याला विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी (ता.२० सप्टेंबर) मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चात रेशनकार्डधारकासह महिलांचा मोठा सहभाग होता. दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, समन्वयक हर्षल सुर्वे आदी पदाधिकारी मोर्चाच्या अग्रभागी होते. ‘रेशनचा अधिकार कायम करा, रेशनसाठी उत्पन्नाची किमान मर्यादा दोन लाख रुपये करा, रेशनवर तेल, डाळ आणि साखर मिळाले पाहिजे, उत्पन्नावर आधारित रेशनकार्ड बंद करू नका, गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपये करा, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करा’ अशा विविध मागण्या करण्यात आल्या. व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड, ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणला.
मोर्चामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, कागल तालुका प्रमुख संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, राजू यादव, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, प्रतिज्ञा उत्तुरे, राजू जाधव, अवधूत साळोखे, धनाजी दळवी, दीपक गौड, अनिल पाटील, कमलाकार जगदाळे, विशाल देवकुळे, सुशिल भादिंगरे, पोपट दांगट, महेश उत्तुरे, राहुल माळी, मंजित माने आदींचा सहभाग होता.