शाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !
schedule22 Jun 26 person by visibility 6 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य हे सर्वव्यापी होते. त्यांच्या विचारकार्यांचा वारसा पुढे चालविणे ही साऱ्यांची जबाबदारे आहे. ते बहुजन विचारांचे नायक तर विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ होते.’असा सूर राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदेत उमटला.
येथील राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे परिषदेचे आयोजन केले होते. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला. या परिषदेला उत्तरप्रदेशमधील कानपूर येथील कैलास पटेल उपस्थित होते. त्यांनी उत्तर प्रदेशमधील कुर्मी समाज व कोल्हापूरचे शेकडो वर्षापासून संबध आहेत. राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक व कुर्मी समाजाची स्थापना १८९४ मध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. कानपूरचे जे. एन. कटियार व राजेश कुमार यांनी ’राजर्षी शाहू महाराज यांचे विचार कार्य हे संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांचा बहुजन समाजाच्या विकासाचा विचार साऱ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे.’ गोंडा येथील नंदकुमार वर्मा यांनी भाषणात राजर्षी शाहू कार्याला उजाळा दिला. धारवाड येथील डॉ. माधुरी चौगुले यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्व विषद केले.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी शाहू कार्यावर विवेचन केले. उत्तर प्रदेशात शाहू कार्याचा प्रचार व प्रसार ही झपाटयाने झाला. शाहू महाराज जितके उत्तर प्रदेशला कळाले, तितके ते कोल्हापूरकरांना कळाले नाहीत असे मत सावंत यांनी व्यक्त केले. परिषदेचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी परिषद आयोजनामागील उद्देश सांगितला. परिषदेचे सहनिमंत्रक बबनराव रानगे यांनी सूत्रसंचालन केले. संजय कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.