शाहिरी पोवाड्यांनी गर्जली छत्रपती शाहू मिल...!
schedule08 May 23 person by visibility 208 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बाहेर ढगांचा गडगडाट आणि आतमध्ये वैचारिक स्वरांचा कडकडाट अशा जुगलबंदीत पुन्हा एकदा शाहू मिल वैचारिक स्वरांनी गर्जत होती. निमित्त होते राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व निमित्त आयोजित शाहिरी पोवाड्याचे.
शाहीर दिलीप सावंत यांनी आपल्या पोवाड्यामधून स्वरांचा कडकडाट करताच प्रेक्षकांच्या अंगावर वैचारिकतेचे आणि स्फुर्तीचे शहारे उभे राहिले.
शाहीर दिलीप सावंत आणि शाहीर रंगराव पाटील यांनी सादर केलेल्या पोवाड्यामधून स्त्री सबलीकरण, क्रीडा, कला, साहित्य, कृषी, शिक्षण, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात शाहू महाराजांनी केलेल्या गौरवशाली कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात इतिहास विभागाच्या प्रा.कविता गगराणी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी तमाम शाहू प्रेमी या अविस्मरणीय कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते.
राखेत पेटली ठिणगी! अस्मितेची ठिणगी !आग ही जंगी !भडकला वणवा साऱ्या देशात! मुजरा करुनि त्या महारुद्रास ! शाहू राजांच्या ऐका पोवाडयास!! जी ! जी जी जी !!
असा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर जागा करत शाहीरी पोवाड्यातून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना शाहिरांनी आदरांजली अर्पण केली.
शाहीर दिलीप सावंत, शाहीर रंगराव पाटील, शाहिरा तृप्ती सावंत यांनी पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची महती विशद केली. यात कव्वाली, ओवी, वेदोक्तावरील शाहिरी फटकारा सादर केला. त्याचबरोबर महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख पोवाड्यातून करुन दिली.