कोल्हापुरात घडलेला, पुरस्कारांनी गौरविलेला गाभ झळकला सिनेमागृहात
schedule21 Jun 24 person by visibility 420 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माध्यम कोणतेही असो हटके कलाकृती तयार करायची अशी खासियत असलेला तरुण दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि नव्या दमाचा निर्माचा मंगेश नारायण गोटुरे यांनी वेगळया विषयावर गाभ हा सिनेमा तयार केला आहे. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ही कलाकृती कोल्हापुरच्या मातीत तयार झाली आहे. निर्माता, दिग्दर्शक, बहुतांश कलाकार, तंत्रज्ञ आणि बहुतांश शूटिंग जिल्हा परिसरात झाले आहे. प्रदर्शनापूर्वीच वेगवेगळया चित्रपट महोत्सवात गाभ हा सिनेमा गौरविला. समीक्षकांनीही तो नावाजला आहे. २१ जून २०२४ पासून हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
निखळ मनोरंजनासोबतच सामाजिक भान जपणारा हा सिनेमा आहे. माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा हे सिनेमाचं सूत्र आहे. या सिनेमात अभिनेता कैलास वाघमारे व सायली बांदेकर ही फ्रेश जोडी पडद्यावर झळकणार आहे. या दोघासोबत विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत.
सिनेमात दोन गाणी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. छायातचित्रण वीरधवल पाटील यांनी तर संकलन रवींद्र चांदेकर यांनी केले आहे. चंद्रशेखर जनवाडे यांची गीते आहेत. रवींद्र चांदेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत. विविध महोत्सवात मिळून या सिनेमाने २७ पुरस्कार मिळवले आहेत.