राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटील
schedule26 Jun 26 person by visibility 20 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी , कोल्हापूर : गोकुळ ही दूध उत्पादकांची संस्था असून ती वाचविण्यासाठी सर्वांनी गावपातळीवरील राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडी सोबत एकत्र या अशी साद आमदार सतेज पाटील यांनी सभासदांना घातली. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील ठरावधारकांनी राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीला जाहीर पाठींबा दिला. यावेळी अजिंक्यतारा कार्यालय येथे आयोजित ठरावधारकांच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराचा आढावा घेतला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासात राजर्षी शाहू महाराजांचे योगदान मोठे आहे. स्वर्गीय आनंदराव चुयेकर यांच्या प्रयत्नांतून गोकुळ दूध संघाची स्थापना झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात गोकुळने मोलाची भूमिका बजावली. "ऊसाचा पैसा खर्चासाठी उपयोगी पडतो, पण दुधाचा पैसा शिल्लक राहतो. त्यामुळे शेतकरी स्वाभिमानाने उभा राहिला. गेल्या पाच वर्षांतील गोकुळच्या कामकाजाचा उल्लेख करताना त्यांनी दूध दरात मोठी वाढ केल्याचे सांगितले. मुंबईमध्ये जागा घेऊन आधुनिक पॅकिंग प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याचे कर्ज अवघ्या 3 वर्षांत फेडले. सौरऊर्जा प्रकल्प उभारून संस्थेला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून दिला, त्यातून दरवर्षी 4 ते 5 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लंपी आजाराच्या काळात म्हशींच्या लसीकरणासाठी गोकुळने मोठ्या प्रमाणावर काम केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. गोकुळ संस्था टिकली तरच दूध उत्पादक टिकतील. त्यामुळे संस्था वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
सर्व दुध उत्पादकांचा आमदार सतेज पाटील यांच्यावर विश्वास असून ते त्यांच्या पाठीशी ठामपणे राहतील, असा विश्वास बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जीवन पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सचिन घोरपडे यांनी, सध्याची परिस्थिती पाहता गोकुळ दूध संघाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांच्या हाती द्यावे, अशी जिल्ह्यातील बहुतांश दूध उत्पादक व ठरावधारकांची भावना असल्याचे सांगितले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रकाश पाटील, अमर पाटील, एस. एम. पाटील, एन. के. देसाई, भुजंगराव मगदूम, बाबासो देसाई, दिलीप केणे, सागर देसाई, अमर बरकाळे, अमोल पाटील, ऋषिकेश पाटील, नेताजी आरडे, विश्वजीत हाप्पे, जयवंत पाटील उपस्थित होते.