सतेज पाटलांचे राजाराम कारखानाविषयीचे प्रेम पुतना मावशीचे - अमल महाडिकांचे टीकास्त्र
schedule16 Mar 23 person by visibility 1955 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर :
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागले. विरोधी आघाडीचे आमदार सतेज पाटील यांनी वाशी येथील सभेत बोलताना राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन झाल्यास कारखान्याचा सातबारा महाडिकांच्या नावावर होईल अशी टीका केली होती. त्या टीकेचा सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी समाचार घेतला आहे. महाडिक यांनी हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, चंदूर, मुडशिंगी इत्यादी गावांचा दौरा केला. या दौऱ्यात महाडिक यांनी सतीश पाटील यांच्यावर टीका करताना , "कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं तसंच काहीसं विरोधकांचं झालं आहे. स्वतः स्वार्थाच्या चष्म्यातून पाहत असल्यामुळे त्यांना सगळीकडे स्वार्थ दिसून येतो. कारखान्याचे सभासद याहीवेळेस त्यांना नाकारणार हे समजल्यामुळे आलेले नैराश्य विरोधक लपवू शकत नाहीत. या नैराश्येतुनच ते वक्तव्य करत असतात. पण जाईल तिथे जमिनी लाटण्याचा इतिहास असणाऱ्यांनी कारखान्याच्या सातबाऱ्याबाबत चिंता करू नये." अशा शब्दात निशाणा साधला
अमल महाडिक म्हणाले "सातबारा नावावर करतील वगैरे बोलून सभासदांची दिशाभूल करू पाहणाऱ्यांना कदाचित याचा विसर पडला असावा. पण मागील २७ वर्षे आम्ही या कारखान्यात सहकार जपण्याचं काम केलेलं आहे, आणि इथल्या प्रत्येक सभासदाला त्याची जाणीव आहे. स्वतःच्या डी वाय पाटील कारखान्याचे सभासद रातोरात कमी करणाऱ्यांना आता सभासदांची काळजी वाटू लागली आहे. हे पूतना मावशीचे प्रेम सभासदही ओळखून आहेत. जिल्ह्यातल्या किती सातबारा उताऱ्यांवर तुमची नावं लागली आहेत हे जनतेला ठाऊक आहे. राजाराम कारखान्याचा सुज्ञ शेतकरी सभासद नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहिला आहे आणि यापुढेही उभा राहील"
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, शिवाजी घोरपडे, राजु मगदूम, बंडू भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश पाटील यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी करवीर तालुक्यात दौरा केला. वाशी येथील विठ्ठल मंदिरात सभा घेतली. कारखान्याच्या कामकाजावरून महाडिक यांच्यावर टीका केली. यावेळी भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, महादेव पाटील, सुरेश पाटील, बबन रानगे उपस्थित होते.