प्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण
schedule16 Oct 24 person by visibility 336 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतनिधी, कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी काम, सामाजिक कार्यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे (केएमए) दिला जाणारा ‘ डॉ. अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार’ कोल्हापुरातील प्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ शकील मोमीन यांना जाहीर झाला आहे. केएमएतर्फे आयोजित दोन दिवसीय केएमए कॉन २०२४ या परिषदेत २० ऑक्टोबरला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. केएमएचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकरव परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिपक जोशी यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
डॉ. मोमीन हे १९८१ पासून भूलतज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत. त्यांनी भूलशास्त्राविषयी नागरिक व डॉक्टरमंडळीत जागरुकता निर्माण करण्याचे कामही केले आहे. डॉ. मोमीन, डॉ. दिलीप परांजपे, डॉ. सिद्धेश्वर भडंगे यांनी एकत्र येऊन १९८७ मध्ये ‘फिरते अतिदक्षता पथक’सुरू केले होते. डॉ. मोमीन यांचे वैद्यकीय शास्त्र व सामाजिक विषयासंबंधी १०० हून अधिक लेख प्रसिद्ध् आहेत. ते ब्लॉगही लिहितात. ‘बधीर-कथा आणि व्यथा’ या शीर्षकाखाली त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत.
डॉ. मोमीन हे भूलतज्ज्ञांच्या संघटनेशी निगडीत आहेत. त्यांनी, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी 1995-96 मध्ये काम केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा दोन वर्षे सांभाळली आहे. अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्या कार्यकारिणीत काम केले आहे. चार दशकाहून अधिक काळ भूलशास्त्रात कार्यरत आहेत. या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून डॉ. मोमीन यांना यंदाचा ‘डॉ. अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार’देऊन सन्मान करण्यात येणार आहे.