शहरातील पाच मोठया हॉस्पिटल्सवर दंडात्मक कारवाई ! जैव वैद्यकीय कचऱ्याप्रश्नी महापालिकेचा डोस !!
schedule20 May 24 person by visibility 575 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राजारामपुरी येथील डॉ.चंद्रशेखर पाटील यांचे साई कार्डीयाक सेंटर हॉस्पीटलने जैव वैद्यकीय कचरा ॲटो टिप्परमध्ये टाकल्याने त्यांना नोटीस देऊन पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. महापालिकेच्या घरगुती कचरा संकलन करणा-या ॲटो टिप्परमध्ये बेकादेशीरित्या हा जैव वैद्यकीय कचरा त्यांनी टाकल्याने हा दंड करण्यात आला आहे. हि कारवाई सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्य निरिक्षकांनी केली आहे.
तसेच राजरामपुरी येथील मोरया हॉस्पीटल, जानकी हॉस्पीटल व स्टार हॉस्पीटलने रस्त्यावर व कोंडाळयाच्या ठिकाणी घातक जैव वैद्यकीय कचरा टाकल्याने त्यांच्या आस्थापनांना नोटीस देण्यात आली आहे. नोटीस वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ च्या तरतुदीनुसार देण्यात आली आहे. या तरतुदीनुसार या सर्वांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शास्त्रीनगर येथील ॲस्टर आधार हॉस्पीटलच्या येथे सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांना पाहणी करताना त्यांच्या कच-यामध्ये बायो मेडिकल वेस्ट आढळून आले आहे. त्यांनाही नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.
दंडात्मक कारवाई भागातील आरोग्य निरिक्षक ऋषीकेश सरनाईक, मुनीर फरास, श्रीराज होळकर यांनी केली आहे.