कमर्शियल बँकेत सत्तारुढचा एकतर्फी विजय ! अमर शेळके पराभूत !!
schedule13 Mar 23 person by visibility 853 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारुढ पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या अकरा जागा व बिनविरोध निवड झालेल्या तीन जागा असे एकूण १४ जागा सत्ताधारी पॅनेलने जिंकल्या. सत्ताधारी गटातून उमेदवारी न मिळालेल्या बँकेचे माजी चेअरमन प्रा.अमर शेळके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. विमुक्त जाती भटक्या जमाती मागास प्रवर्गातून शेळके यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना ८६० मते मिळाली. याच गटातील सत्ताधारी पॅनेलचे विजयी उमेदवार युवराज धोंडीराम गवळी यांना २००२ मते मिळाली.
कमर्शियल बँकेच्या चौदा जागेसाठी निवडणूक लागली होती. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र काही जागावर एकमत झाले नाही. त्यामुळे बँकेची निवडणूक लागली. दरम्यान सत्ताधारी पॅनेलमधील महिला प्रतिनिधी गटातील उमेदवार शर्मिला शिरीष कनेरकर व वैशाली प्रशांत शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच इतर मागास प्रतिनिधी गटातून सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार रामचंद्र आनंदा कुंभार यांची बिनविरोध निवड झाली.
चौदापैकी तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित अकरा जागेसाठी निवडणूक लागली होती. अकरा जागेसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. रविवारी झालेल्या मतदाना दिवशी अठरा हजार सभासदांपैकी तीन हजार ७५ सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी निवडणुकीचे काम पाहिले. मार्केट यार्ड येथील सभागृह येथे सोमवारी सकाळी मतमोजणी झाली. मतमोजणी मध्ये अध्यक्ष प्रमाणे सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली. सर्वसाधारण गटातून सत्ताधारी पॅनलचे उमेदवार व विद्यमान चेअरमन गौतम शंकरराव जाधव २३४३ मते, प्रदीप नारायण जाधव २३३५ राजेंद्र महादेव डकरे २३४४, अनिल अनंतराव नागराळे २२९५, रामराव विठ्ठलराव पवार २२७५, उदय जयवंतराव महाजन २२६६, अतुल गुणवंतलाल शहा २२५०, भाऊसो दादोबा सावंत २३५८, राजेंद्र खंडेराव संकपाळ २१७० हे उमेदवार विजयी झाले. सर्वसाधारण गटातून माजी संचालक आनंदराव सदाशिव पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला. मात्र अर्ज माघारीच्या प्रक्रियेत त्यांचा उमेदवारी अर्ज वेळेत माघार न घेतल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांच्या नावाचा उल्लेख होता. त्यांना ५९० इतकी मते मिळाली.
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटात सत्ताधारी पॅनेलमधून रवींद्र नरसिंगा हटकर यांनी २२०४ मते घेत विजय मिळवला. या गटातील अपक्ष उमेदवार विजयकुमार कृष्णराव कामत यांना ५५० मध्ये मिळाले. विमुक्त जाती भटक्या जमाती मागास प्रवर्गातून सत्ताधारी पॅनलचे उमेदवार युवराज धोंडीराम गवळी २००२ मते घेत विजयी झाले. या गटातून बँकेचे माजी चेअरमन प्रा. अमरसिंह भगवानराव शेळके यांना पराभव पत्करावा लागला.