एनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल
schedule19 Jul 24 person by visibility 418 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एनआयटी) विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी २०२४ परीक्षेत यश प्राप्त केले. अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील राजनंदिनी भोपळे ९७.६७ टक्के गुण मिळवून अव्वल ठरली. स्वप्नाली राठोड (इलेक्ट्राॅनिक्स) ९४.५३ टक्के, श्रावणी पाटील (इलेक्ट्रीकल ) ९४.५० टक्के, मानसी खाडे (इलेक्ट्रीकल) ९४.२२ टक्के, सई पिंगळे (मेकॅनिकल) ९३.४४ टक्के यांच्यासह तब्बल २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून देदीप्यमान यश प्राप्त केले.
राजनंदिनी भोपळे, स्वप्नाली राठोड, रेवती मोरे, प्रेरणा कदम, आदर्श पाटील, विराज पडवळ आदींनी विविध विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून ते बोर्डात अव्वल ठरले. सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींचे हे यश एनआयटीमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत उच्च शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित करते अशा शब्दांत चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. गेली ४० वर्षे तंत्रशिक्षणात अग्रेसर ठरलेले न्यू पॉलिटेक्निक आता न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी या नव्या रूपात शैक्षणिक दर्जा आणखी उंचावत उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनेल, असे प्रतिपादन एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी केले. एनआयटीमध्ये आता डिप्लोमासह डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस उपलब्ध झाले आहेत.