महापलिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मागितल्या वीस जागा ! इंडिया आघाडीत चर्चा सुरू ! !
schedule13 Dec 25 person by visibility 100 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीठी इंडिया आघाडीत जागा वाटपासाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी इंडिया आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसची समिती सात जणांची समिती नेमली आहे. काँग्रेसच्या या समितीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (१३ डिसेंबर २०२५) जााग वाटपासंबंधी चर्चा केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महापालिका निवडणुकीत वीस जागा मागितल्या आहेत.
महापालिकेच्या वीस प्रभागातील ८१ जागेसाठी निवडणूक होणार आहे. इंडिया आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढविणार असल्याचे नेते मंडळींनी म्हटले आहे. काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, राजेश लाटकर, भारती पोवार, आनंद माने, विक्रम जरग, तौफिक मुलानी, भरत रसाळे यांचा समावेश आहे. ही समिती मित्रपक्षाशी चर्चा करुन जागांच्या अपेक्षा, प्रभागनिहाय ताकत यासंबंधी चर्चा करणार आहे. काँग्रेसच्या या समिती सदस्यांसोबत राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
बैठकीच्या केंद्रस्थानी जागा वाटपाचा विषय होता. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाजीराव खाडे, पद्मजा तिवले, सुनील देसाई, गणेश जाधव, मकरंद जोंधळे, सुरेश कुरणे आदींचा समावेश होता. या बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वीस जागा पक्षाला मिळाव्यात असा प्रस्ताव ठेवला आहे. प्रत्येक प्रभागात एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला हवी असा प्रस्ताव पहिल्याच बैठकीत दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत ३५ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. ही संख्या आणखी वाढू शकते असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढताना राष्ट्रवादीला प्रत्येक विभागात एक यानुसार एकूण वीस जागा मिळाव्यात असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. शनिवारी प्राथमिक बैठक झाली. येत्या तीन दिवसात पुन्हा बैठका, चर्चा होणार आहे.