केएमटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी सोमवारी मुंबईत बैठक
schedule31 Oct 25 person by visibility 33 categoryमहानगरपालिका
 
        महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत (केएमटी) रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करण्याबाबत सोमवारी (३ नोव्हेंबर २०२५) मुंबईत बैठक होत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांनी, एकत्रितपणे शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) पालकमंत्री प्रकाश आबिटकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. याप्रसंगी आमदार क्षीरसागर यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासंबंधी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. पालकमंत्री आबिटकर यांनी केएमटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी सोमवारी मंत्रालयात बैठक घेऊ. मी व आमदार क्षीरसागर ही त्या बैठकीला असतींल. कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे.’असे सांगितले. या बैठकीसाठी कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुंबईला येण्यासंबंधी त्यांनी सूचना केली.
केएमटीकडे तब्बल १५६ वाहक-चालक हे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ रोजंदारी तत्वावर काम करत आहेत. काही कर्मचारी तर १९९२ पासून सेवेत आहेत. १९९९, २००० आणि २००५ या वर्षी रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. मात्र त्यांना कायम सेवेत समाविष्ठ केले नाही. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनी कायम सेवेत समाविष्ठ होण्याबाबत आंदोलने केली. संपाचा इशारा दिला. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करुन आमदार क्षीरसागर यांनी याप्रश्नी लक्ष घातले. सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या प्रश्नाची सोडवणूक करावी म्हणून केएमटीतील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आमदार क्षीरसागर यांची भेट घेतली. त्यांनी, सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करू असे सांगितले.
सायंकाळी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. युनियनचे सचिन जाधव, ईरशाद नायकवडे, निशिकांत सरनाईक यांच्यासह कर्मचारी मोठया संख्येने जमले होते. त्यांनी, पालकमंत्री आबिटकर व आमदार क्षीरसागर यांची भेट घेतली. या प्रश्नी निर्णय घेण्यासाठी सोमवारी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेऊ असे आबिटकर व क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.
………………………..
संघटनेतील धुसफूस
केएमटी कर्मचारी विविध मागण्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. दुसरीकडे केएमटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेतील गटबाजी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही नेतेमंडळी व संघटनेतील धुसफूस दिसून आली. प्रत्येकजण सवतासुभा मांडत असल्याचे चित्र होते. किरकोळ वादाचे प्रसंगही उद्भवले.
 
                     
 
 
 
