कोल्हापुरात शुक्रवारी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५-२६
schedule15 Dec 25 person by visibility 29 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल ( एमईडीसी) व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफर्मेनशन ( मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्रमुख विकास क्षेत्रांमध्ये कार्यरत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सक्षम व बळकट करण्याच्या उद्देशाने १९ डिसेंबर २०२५ रोजी एकदिवसीय " एमईडीसी : एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५ - २६" आयोजित केली आहे. अशी माहिती एमईडीसीचे प्रादेशिक संचालक सत्यजित भोसले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन गोशीमाचे अध्यक्ष सुनिल शेळके, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उद्योजक सचिन शिरगावकर यांनी दिली. हॉटेल सयाजी येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत ही परिषद होत आहे.
या परिषदेच्या माध्यमातून धोरणकर्ते, उद्योजक, उद्योग नेते आणि तज्ज्ञ एकत्र येऊन व्यावहारिक उपाययोजना, विविध शासकीय सहाय्य योजना यांची माहिती तसेच अर्थपूर्ण व्यावसायिक संपर्क व सहकार्याच्या संधी निर्माण करतील. या परिषदेतील सत्रांमध्ये स्वयंचलन गुणवत्ता सुधारणा, शाश्वत औद्योगिक पद्धती तसेच कौशल्य विकास या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे. मित्राचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता उद्घाटन आहे. एमईडीसीचे अध्यक्ष अतुल शिरोडकर अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिन इटकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. उद्घाटनानंतर अतुल शिरोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
पहिल्या सत्रात, ‘आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत फाउंड्री क्षेत्रातील नव्या संधी’ याविषयी एमएसएमई बोर्डचे राष्ट्रीय सदस्य प्रदीप पेशकर हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर ‘फाउंड्री उद्योगासाठी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग’यासंबंधी सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शिरगावकर मार्गदर्शन करणार आहेत. ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल्सचे सीए योगेश कुलकर्णी हे २९०० शासकीय एमएसएमई लाभ योजनांद्वारे क्षमता विकास यासंबंधी विचार मांडतील.
अॅड. दत्तात्रय देवळे हे फाउंड्री क्षेत्रासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ - कायदेशीर अनुपालन व नियम यासंबंधी ऊहापोह करतील. परिषदेच्या पाचव्या सत्रात फाऊंड्री तज्ज्ञ संभाजी पवार हे ‘फाउंड्री क्षेत्रातील शाश्वत विकास आणि नफा क्षमता’ याविषयी बोलणार आहेत. या परिषदेतील नोंदणीसाठी medc@medcindia.com किंवा अधिक माहितीसाठी ९३२२३५७५६७ या नंबरवर संपर्क साधावा.