जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिक
schedule15 Dec 25 person by visibility 87 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच भारतीय जनता पक्षाच्या वतीने संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उमेदवारी वरून पक्षांमध्ये कोणतीही बंडखोरी होणार नाही किंवा नाराजी राहणार नाही. महायुतीमधील जागा वाटपाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील. शिवाय महायुती म्हणून एकत्रच निवडणूक लढणार असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या दोन दिवसात ३५० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत. खासदार महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मुलाखीत घेतल्या. सोमवारी, १५ डिसेंबर रोजी मुलाखतीच्या दरम्यान खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर महापालिका निवडणूकीतील जागा वाटपांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत, उमेदवारी देताना समतोल साधला जाईल. तसेच निवडणुकीत तरुण युवकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के जागावर युवा पिढीला संधी दिली जाईल,
महाडिक म्हणाले.‘ पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणार्यांची संख्या पाहून आपण भारावून गेलो आहे. त्यातून भाजपबद्दल जनतेमध्ये असणारा विश्वास व्यक्त होत आहे. पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी तसेच त्याच्या विजयासाठी सर्वजण झोकून देऊन काम करतील. सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल राज्यस्तरीय कोअर कमिटीकडे पाठवला जाईल. त्यानंतर चार-पाच दिवसात उमेदवारी संबंधित चित्र स्पष्ट होईल.
‘काही अपवादात्मक ठिकाणी ताराराणी आघाडीकडून उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. मावळत्या सभागृहातील कॉंग्रेसच्या पूर्वीच्या जागांवर महायुती दावा करणार आहे. कॉंग्रेसच्या या जागांचे महायुती मधील घटक पक्षांमध्ये समान वाटप होईल. कोल्हापूर महापालिकेत १५ वर्षे कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. मात्र कोल्हापूर शहराचा विकास झाला नाही. उलट महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाने गती घेतली. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले.’असे महाडिक यांनी नमूद केले.