कोल्हापूर उत्तर तर जिंकणारच, दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरविणार – राजेश क्षीरसागर
schedule07 Oct 24 person by visibility 154 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ जिंकूच शिवाय कोल्हापूर दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरवेल.’असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
शिवसेनेतर्फे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी झाला. कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालय येथे हा मेळावा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनामुळे सामान्य माणूस सुखावला असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी क्षीरसागर यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या माध्यमातून कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली आहेत. दोन्ही मतदारसंघात भगवा फडकेल. महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र सगळी पदे आपल्याच घरात पाहिजेत असे काही जण म्हणत आहेत. पण जनता सर्वश्रेष्ठ असते. जनता सर्व ठरवत असते.’असा टोलाही लगाविला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात नागरी सुविधासाटी निधी दिल्याचे क्षीरसागर यांनी आकडेवारीसह सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचेही भाषण झाले. मेळाव्याला माजी नगरसेवक अमोल माने, शिवाजी जाधव, रमेश खाडे, किशोर घाटगे, महेंद्र घाटगे, रणजित जाधव, अमरजा पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले.