
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या गेल्या पन्नास वर्षातील राजकीय, सामाजिक वाटचालीवर आधारित ‘कोल्हापूरचे महापौर’ या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकार गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी आणि सतिश घाटगे लिखित या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, महापालिकेचा पाच दशकाची कामगिरी,महापौरांची कारकिर्द उलगडण्यात आली आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून ते आजअखेर शहराचे मानाचे पद भूषविणाऱ्या महापौरांच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला आहे. महापौरांची कारकिर्द उलगडताना ज्या त्या काळातील राजकीय घडामोडी, महापौर निवडीचे नाट्य, पडद्याआडच्या घडामोडी, लोकप्रतिनिधी म्हणून महापौरांचे योगदान, शहर विकासाच्या पाऊलखुणा या पुस्तकात पाहावयास मिळतात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे २०२२ मधील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये अक्षर प्रकाशनच्या ‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकास विशष पुरस्कार मिळाला आहे. येत्या २५ मे २०२३ रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी १०.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा आहे.