खंडोबा तालीम मंडळ उपांत्य फेरीत, पाटाकडील पराभूत
schedule26 Mar 23 person by visibility 390 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळाचा टायब्रेकरमध्ये ४-३ असा पराभव करत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पाटाकडील आणि खंडोबाने शॉर्ट आणि लाँग पासेस उत्कृष्ट खेळ करत पूर्वार्धात गोलची आघाडी घेण्यास प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. मध्यंत्तरास गोलफलक कोरा होता. उत्तरार्धात ४९ व्या मिनिटाला पाटाकडीलने गोलची नोंद केली. डी टॉपवर मिळालेल्या पासचे चीज करताना ओंकार पाटीलने डाव्या पायाने मारलेला वेगवान फटका गोलजाळ्यात शिरला. त्यानंतर ऋषीकेश मेथेला गोल नोंदवण्याची संधी मिळाली होती पण ती वाया गेली. ओंकार मोरेचा बॅक किकचा गोल नोंदवण्याचा सुंदर प्रयत्न केला पण चेंडू बाहेर गेला. खंडोबाचा अबु बकरचा वेगवान फटका गोलरक्षक यश यर्डोलेंने सूर मारुन तटवला.
परतफेड करण्यासाठी खंडोबाच्या प्रयत्नाला ६८ व्या मिनिटाला यश मिळाले. खंडोबाला मध्यंत्तरापासून पुढे फ्री कीक मिळाली होती. त्यांचा बचाव खेळाडू मायकेल सेफ यांचा वेगवान फटका गोलजाळ्यात गेला. पाटाकडीलचा गोलरक्षक यश यर्डोलेला बचाव करण्याची संधी मिळाली. मायकेलच्या सेफच्या अफलातून गोलला फुटबॉल शौकिनांची कडाडून टाळी मिळाली. पूर्णवेळेत सामना बरोबरीत राहिल्यावर मुख्य पंच योगेश हिरेमठ यांनी टायब्रेकरचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये खंडोबाकडून मायकेल सेफ, प्रथमेश गावडे, प्रभू पोवार, ऋतुराज संकपाळ यांनी अचूक पेनल्टी मारल्या. पाटाकडीलकडून अक्षय मेथे पाटील, प्रतिक बदामे, ओंकार जाधव यांनी पेनल्टी मारण्यात यश मिळविले. व्हिक्टर जॅक्सनची कीक बाहेर गेली तर ओंकार पाटीलची कीक पोलला तटली. खंडोबाने टायब्रेकरमध्ये ४-३ अशी बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. खंडोबाच्या मायकेल सेफची उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर पाटाकडीलच्या ओंकार मोरेची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली. दरम्यान या सामन्यास खासदार श्रीकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, शहरप्रमुख रणजित जाधव, तुकाराम साळोखे, उदय भोसले, स्पर्धा समिती अध्यक्ष अनिल निकम, महावीर पोवार, सुशांत महाडिक, भैय्या काशीद, अमित शिंदे, अनिकेत पाटील, सागर गौड आदी उपस्थित होते
......
सोमवारचा सामना,
दिलबहार तालीम मंडळ वि. झुंजार क्लब, दुपारी ४ वा.