पशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ
schedule21 Sep 26 person by visibility 38 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यभरातील पशुपालकांच्या पशुधनाला विविध आजार, अपघात व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 'पशुधन विमा योजना राबवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी शेतकरी-पशुपालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 'अॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. (एआयसी) या कंपनीसोबत पशुसंवर्धन विभागाने सामंजस्य करार केला आहे.
पशुधन विमा योजनेमुळे पूर, वीज पडणे, अपघात आणि विषबाधा, तसेच पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास पशुधन गमावणाऱ्या पात्र पशुपालक / शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्यभरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे अॅग्रीकल्बर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडियाची निवड करण्यात आली आहे. विमा प्रीमियमचे दर १ वर्षासाठी ४.३० टक्के, २ वर्षासाठी ७.५० टक्के आणि ३ वर्षांसाठी १०.५० टक्के असे निश्चित करण्यात आले आहेत.
विमा संरक्षणाची मर्यादा व निकषनुसार एका कुटुंबातील कमाल १० पशुधनासाठी अनुदानाचा लाभ मिळेल. दुभत्या गायीचा मृत्यू झाल्यास सत्तर हजार पर्यत विमा संरक्षण, दुभती म्हैसला ८० पर्यंत संरक्षण तरबैल / रेडे यांना अनुक्रमे ७० हजार आणि ८०,००० रुपयेपर्यंत संरक्षण आहे. शेळी व मेंढी: कमाल मूल्य १७,०००/- प्रति जनावर इतके आहे.
विम्यासाठी पशुधनाची नोंद 'भारत पशुधन प्रणाली' (NDLM) वर १२ अंकी कानातील बिल्ल्यासह (असणे बंधनकारक आहे. "नो टेंग, नो क्लेम" या नियमाचे कडक पालन केले जाईल. जनावराचा मृत्यू झाल्यास २४ तासांच्या आत विमा कंपनीला नोंदणीकृत संपर्क माध्यमाद्वारे कळवणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व पोस्ट-मॉर्टम अहवाल सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. पात्र विमा क्लेमची मुदतीत भरपाई न दिल्यास विमा कंपनीला १२ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. राज्यात या योजनेची अंमलबजावणी 'महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूरमार्फत केली जाणार आहे.. निविदा प्रक्रियेअंती प्राप्त प्रिमियम दरानुसार, रु. ७०,००० किंमत असलेल्या संकरित गायीसाठी १ वर्ष, २ वर्षे व ३ वर्षाच्या कालावधीकरिता पशुपालकाला द्यावी लागणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे: कालावधी निविदा १ वर्ष २ वर्षे ३ वर्षे प्रिमियम दर ४.३० टक्के, ७.५० टक्के १०.५०% टक्के. एकूण विमा हप्ता ३,०१० रुपये, ५,२५० रुपये व ७,३५० रुपये आहे. पशुपालकाचा हिस्सा (१५ टक्के) (रुपये) अंतर्गत ४५१.५० रुपये, ७८७.५० रुपये व १,१०२.५० रुपये असा आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी ‘जिल्ह्यातील सर्व पशुपालक व शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची 'भारत पशुधन प्रणालीवर वेळेत नोंदणी अद्यावत करावी. योजनेत सहभागी होणेसाठी पशुपालकांनी "AIC SARUS APP" द्वारे ऑनलाइन नोंदणी करावी.’असे आवाहन केले आहे.
……………………
‘ केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत 'पशुधन विमा योजना' जिल्ह्यातील लाखो पशुपालकांसाठी अत्यंत चांगला निर्णय आहे. जिल्ह्यातील पशुपालकानी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपले पशुधन सुरक्षित करावे, असे मी सर्व पशुपालकांना आवाहन करते.’
- शिल्पा खोत, अध्यक्ष जिल्हा परिषद
………………………….
पशुधन विमा योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे विमा प्रीमियमच्या ८५ टक्के भार केंद्र व राज्य सरकार (६०:४०) उचलणार असून, पशुपालकाला केवळ १५ टक्के हप्ता भरावा लागणार आहे. तसेच, पूर, वीज पडणे, अपघात आणि विषबाधा यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये, तसेच पशुधनाचा अपघाती मृत्यू झाल्यास १५ दिवसांच्या आत थेट बैंक खात्याh विम्याची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- तानाजी पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर