माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार
schedule28 Oct 24 person by visibility 731 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटी या अग्रगण्य राष्ट्रीय संस्थेकडून २०२४ साठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. इंडियन केमिकल सोसायटी ही भारतातील रसायनशास्त्रज्ञांची मातृसंस्था आहे. यंदा शतकमहोत्सव साजरा करीत आहे.
संस्थेच्या या शतकमहोत्सवी वर्षातील जीवनगौरव पुरस्कार डॉ. साळुंखे यांना जाहीर झाला आहे. येत्या १९ ते २१ डिसेंबर २०२४ रोजी जयपूर येथे संस्थेचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्या अधिवेशनात डॉ. साळुंखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासह संस्थेची मानद आजीव फेलोशीपही त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. साळुंखे यांनी जयपूर येथील राजस्थान केंद्रीय विद्यापीठासह देशातील पाच विविध विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे.
डॉ. साळुंखे यांनी रसायनशास्त्र, रसायन अभियांत्रिकीसह संबंधित उद्योगांमध्ये आपल्या संशोधनाच्या माध्यमातून मौलिक योगदान देऊन आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कार्याचा संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करताना संस्थेला अभिमान वाटत आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष प्रा. जी.डी. यादव यांनी डॉ. साळुंखे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.