लाडकी बहीण योजनेत भविष्यात दरमहा रकमेत वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
schedule22 Aug 24 person by visibility 3891 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात जिल्हयातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडकी बहिण योजनेत योजनेत राज्यात एक कोटी चाळीस लाखांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. यातील एक कोटी दहा लाखांहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे पैसेही वितरीत केले.यातून महिला अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरूवात झाली आहे. आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार सदाभाऊ खोत, पुणे महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद प्रशासक कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘लाडकी बहिण योजेनंतर्गत सप्टेंबरअखेर सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील यासाठी सरकारकडून कडून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शासनाकडून कठोर निर्णय घेण्यात येणार असून दोषींना फाशी व्हावी यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा करणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या योजनेबाबत राज्यातील महिलांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. विकासापासून वंचित असणाऱ्या शेवटच्या घटकालाही मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकार करीत असून खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने हे शासन वाटचाल करीत आहे.
कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील दहा महिला लाभार्थी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सहा लाभार्थी, तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात उत्कृष्ट कार्य केलेल्या पाच अंगणवाडी सेविकांचा प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.