विषयनिहाय विद्यार्थ्यांचे अपडेट ज्युनिअर कॉलेजिअसचा आळशीपणा ! माध्यमिक शिक्षणकडून दोन दिवसाची मुदत !!
schedule17 Nov 25 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संच मान्यतेच्या अनुषंगाने विषयनिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी सादर करण्यामध्ये जिल्ह्यातील ६२ ज्युनिअर कॉलेजिअसकडून चालढकल सुरू आहे. जिल्ह्यातील २८४ कॉलेजपैकी अद्याप ६२ कॉलेजिअसनी यासंबंधीची ऑनलाइन माहिती भरली नाही. येत्या दोन दिवसात संबंधित कॉलेजकडून माहिती सादर झाली नाही संबंधित कॉलेजसंबंधीची शिफारस शिक्षण विभागास केली जाणार नाही असा पवित्रा माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे. मुदतीत विषयनिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी सादर झाली नाही तर संबंधित कॉलेजमधील शिक्षक हे अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दरवर्षी विषयनिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी संकलित होते. यंदा, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे सोपविली. ऑनलाइन स्वरुपात माहिती सादर करायची असते. यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने चार वेळा संबंधित कॉलेजच्या मुख्याध्यापकांशी ऑनलाइन संवाद साधला. एकदा मेन राजाराम हायस्कूल येथे कार्यशाळा घेतली. माहिती सादर करण्याविषयी माहिती दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी मार्गदर्शन केले. कोणत्या विषयाला किती विद्यार्थी आहेत यासंबंधीची माहिती लवकर जमा करावे असे आवाहन केले.
जिल्ह्यात ज्युनिअर कॉलेजिअसची संख्या २८४ इतकी आहे. यामध्ये अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहायित तत्वावरील कॉलेजचा समावेश आहे. २८४ पैकी ६२ कॉलेजिअसनी अद्याप माहिती भरली नाही. यामध्ये ४० अनुदानित कॉलेज आहेत. तर उर्वरित कॉलेज हे विना अनुदानित आणि स्वयंअर्थसहायित आहेत. यामध्ये जिल्ह्यातील काही मोठया शैक्षणिक संस्थांच्या कॉलेजचा समावेश आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत म्हणाल्या, ‘विषयनिहाय विद्यार्थ्यांचे अपडेट कळविण्यासंबंधी ज्युनिअर कॉलेजिअसना सातत्याने कळविले आहे. अद्याप काही कॉलेजकडून माहिती सादर झाली नाही. वेळेत माहिती जमा झाली नाही आणि शिक्षण विभागाकडे सादर होण्यास विलंब झाला तर शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात. जे कॉलेज माहिती सादर करणार नाहीत त्या कॉलेजशी निगडीत शिफारसी केल्या जाणार आहेत. संबंधित ज्युनिअर कॉलेजनी दोन दिवसात विषयनिहाय अपडेट ऑनलाइन स्वरुपात भरावेत.’