शिक्षक बँकेतील राजकारण उफाळले ! सत्ताधारी- विरोधकांत वाकयुद्ध, आजी - माजींचा कारभार चव्हाटयावर!!
schedule17 Nov 25 person by visibility 65 categoryशैक्षणिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था म्हणून दि प्राथमिक शिक्षक बँकेची ओळख. सगळे सभासद हे पगारदार नोकर. बँकेवर वर्चस्व कोणाचा हा मुद्दा नेहमीच शिक्षक संघटनासाठी प्रतिष्ठेचा. निवडणूक असो की वार्षिक सभा, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नाहीत. नोकरभरतीवरुन मागील संचालकांना सहा वर्षासाठी अपात्र का करू नये हा सहकार विभागाचा आदेश फेरचौकशीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी रद्द ठरविला. या निर्णयावरुन पुन्हा एकदा बँकेच्या आजी -माजी संचालकांत वाकयुद्ध रंगत आहे. त्या माध्यमातून सध्याच्या व मागील संचालक मंडळाचा कारभारही चव्हाटयावर येत आहे.
बँकेतील विद्यमान संचालक सुनील एडके यांनी मागील संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या नोकरभरती केल्याचा आक्षेप ठेवताना स्टाफिंग पॅटर्नची आकडेवारी मांडली. ‘चार नंतर येते चार, नेत्यांचे गणित कच्चे फार’या नावांनी पोस्ट करत १२९ कर्मचाऱ्यांचा स्टाफिंग पॅटर्न निदर्शनास आणला. त्या स्टाफिंग पॅटर्नमध्ये चार नंतर पाच ऐवजी पुन्हा चार असा उल्लेख करत अनुक्रमे पन्हाळा व शिरोळ येथील शाखेची कर्मचारी संख्या दर्शविल्याचे एडके यांनी समोर आणले आहे. त्यावर प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाचे पदाधिकारी मारुती दिंडे यांनी ‘सध्या बँकेत शिपाई व संगणकतज्ज्ञ भरताना सध्याच्या संचालकांचे गणित फारच पक्के आहे. तसेच पूर्वीच्या संचालक मंडळास दोष देऊन सध्याच्या संचालक मंडळाने शिपायांना प्रमोशन देऊन क्लार्क केले. नवीन शिपाई भरण्यासाठी पद तयार केले. शिवाय नवीन शिपाई पद भरताना कोणती प्रक्रिया राबविली ?’असा पलटवार केला.
त्यावर शिक्षक संघ थोरात गटाचे बँकेतील संचालक एडके यांनी, ‘शिपाईचे प्रमोशन करुन बँकेचे आयटी हेड कोण केले होते ? ’अशी विचारणा करत मागील संचालकांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केला. तर थोरात गटाचे तानाजी मेढे यांनी, ‘शिपाई पदावरुन क्लार्क झालेले कर्मचारी योग्य कामकाज करत आहेत आहेत, पण मागील संचालकांनी नेमलेल्या क्लार्कना साधी बेरीज करता येत नव्हती. अशी नोकर भरती केलेल्यांना नोकर भरतीवर बोलण्याचा अधिकार नाही.’अशा शब्दांत जुन्या संचालकांचा समाचार घेतला. यावर मागील संचालक मंडळातील तत्कालिन संचालक प्रसाद पाटील यांनी,‘जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयामुळे सत्य जगासमोर आले. विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या चांगल्या कारभाराच्या फक्त बाताच, चार वर्षे होत आली, नियमित कर्जावरील व्याजदार एक टक्का तरी कमी होणार का ?’या शब्दांत सध्याच्या संचालक मंडळावर हल्लाबोल केला.
……………..
‘ शिक्षकी पेशात शिक्षकांच्या प्रश्नासाठी निर्माण झालेल्या वेगवेगळया संघटना आपआपल्या परीने अयोग्य धोरणाविरोधात लढत आहेत.मात्र शिक्षक बँक राजकारणात निव्वळ द्वेषाचे राजकारण समोर येत आहे. खरंच शिक्षक संघटनामध्ये इतका राजकीय द्वेष असावा का ? नोकरभरतीवरुन सभासदांनी केलेल्या तक्रार अर्जावर विद्यमान संचालक मंडळाने चौकशी समिती नेमली.चौकशी समितीतील अध्यक्ष व सचिव हे दोघेही बँकेचे सभासद व सुकाणू समितीचे सदस्य आहेत.त्यांच्याकडून निपक्षपातीपणाने चौकशी झाली असेल का ? निव्वळ राजकीय द्वेषापोटी चौकशीचा कसलाही अधिकार नसलेल्या शिक्षक सभासदांना चौकशीचे अधिकार देऊन विद्यमान संचालक मंडळाने चौकशीचा फार्स केला नाही का ?’
- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना
…………………………………………..
‘ शिक्षक बँकेत चुकीच्या पद्धतीने मागील संचालकांनी नोकर भरती केली यासंबंधी सभासदांच्यावतीने तक्रार केली. त्यासंबंधी डीडीआरने कागदपत्र घेऊन चौकशी केली. सहकार आयुक्ताने कारवाई केली. पन्हाळा शाखेसंबंधी चार- चार आकडा टाकून दहा जागा दाखविल्या. औद्योगिक न्यायालयाची फसवणूक केली आहे. या संदर्भात बँक योग्य ती कायदेशीर दाद मागेल. पन्हाळा शाखेवर दाखविलेले दहा कर्मचारी त्यांचा पगार इतरत्र काढला, ती रक्कम मागील संचालकाकाकडून वसूल करण्यासंबंधात कायदेशीर दाद मागू. सभासदांच्या तक्रारीनुसार सहकार विभागाने कारवाई केली होती, यामध्ये द्वेषाचे राजकारण कोठून आले ? ’
सुनील एडके, विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष शिक्षक बँक