इंधन बचत हीच राष्ट्रसेवा…शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांचा बसमधून प्रवास
schedule15 May 26 person by visibility 77 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल बचतीसंबंधी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी, शुक्रवारी पंधरा मे २०२६ रोजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला. प्राथमिक शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव व प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी एसटी बसने प्रवास करत इंधन बचतीच्या उपक्रमात कृतीशील सहभाग नोंदविला. पदाधिकारी व अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध चारचाकी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले. यानिमित्ताने ‘इंधन बचत हीच राष्ट्रसेवा…’याची प्रचिती घडली.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी सध्य स्थितीमध्ये दर शुक्रवारी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एसटी बसेस, इलेक्ट्रिक वाहने व सायकलचा वापर करावा असे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा परिषदेत या उपक्रमाची अंमलबजावणी झाली. या उपक्रमात सहभागी होताना शिक्षण समिती सभापती यादव व शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी एसटी बसने प्रवास केला. शिक्षण समितीची सभा, शुक्रवारी कागल तालुक्यात आयोजित केली होती. या सभेला सभापती यादव व शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी बसमधून प्रवास करत उपस्थित राहिलया. ’सामान्य नागरिकांनीही सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून देशहिताच्या या उपक्रमात सहभागी व्हावे,’ असे आवाहन यावेळी करण्यात आले. बसमधून प्रवास करताना त्यांनी प्रवाशी वर्गांशी संवाद साधला.