सन्मान वारशाचा - पुनर्भेट नात्यांची ! केआयटीच्या प्रगतीसाठी दिल्लीत एकवटले माजी विद्यार्थी !!
schedule15 May 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘सन्मान वारशाचा आणि पुनर्भेट नात्यांची’या संकल्पनेचा अनोखा संगम म्हणजेच कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (केआयटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटने (किटा ) आयोजित केलेला ‘अल्युमिनी मीट २०२६’ हा सोहळा. ९ मे २०२६ रोजी नवी दिल्लीतील क्राउन प्लाझा, ओखला येथे उत्साह, अभिमान आणि आपुलकीच्या वातावरणात दिमाखात झाला.
प्रामुख्याने मध्य व उत्तर भारतातील तसेच अन्य देशातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या शेकडो माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.नोंदणी प्रक्रियेनंतर प्रा. जाहिदा खान यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन झाले. केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी संस्थेच्या ४३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आलेख प्रभावी सादरीकरणातून उलगडून दाखवला. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, उद्योगसहकार्य आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला.
केआयटी व किटाचे अध्यक्ष साजिद हुदली या प्रसंगी म्हणाले, “ दरवर्षी भारतात वा परदेशात तेथील चॅप्टरच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघाचा मेळावा होत असतो.त्यामुळे अधिकाधिक देश विदेशातील माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पोर्टलवर नोंदणी करून मातृ संस्थेच्या शाश्वत विकासात व केआयटी ला जागतिक ब्रँड करण्यात आपले योगदान द्यावे.” तसेच दर महिन्याला होणाऱ्या ‘किटा कनेक्ट’ या ऑनलाइन संवादातून आपली वा आपल्या व्यवसायाची यशोगाथा आणि अनुभव सध्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना केले. या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमधील बंध अधिक दृढ झाले असून, संस्थेशी असले नाते अधिक घट्ट झाले आहे, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली
केआयटी चे विश्वस्त व माजी विद्यार्थी संघाचे (किटा) उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. दिल्ली चॅप्टर प्रमुख आयुष देव कौशिक, पुणे चॅप्टर प्रमुख प्रकाश सोमय्या आणि कोल्हापूर चॅप्टर सदस्य पुनीत गांधी यांनी आपल्या आठवणींनी कार्यक्रमात भावनिक रंग भरले. ‘उजाळा’ या विशेष सत्रात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील गोड आठवणी, मजेदार किस्से आणि अनुभव शेअर केले. या संपूर्ण आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले आणि विश्वस्तांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. अधिष्ठाता – माजी विद्यार्थी डॉ. सुनील कारिदकर यांनी आभार मानले..