कोल्हापुरातील १९० शाळांना मोफत पाठयपुस्तक वाटपास प्रारंभ
schedule22 May 24 person by visibility 417 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना समग्र शिक्षा अभियानतंर्गत मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील १९० प्राथमिक शाळांतील सुमारे ४५,३७८ विद्यार्थ्यांकरीता १,८१,५१२ पुस्तकांच्या प्रती प्राप्त झाल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते शहरातील सर्व शाळामधील मुख्याध्यापकांकडे पाठयपुस्तके सुपूर्त करण्यात आली. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी व बाळासो कांबळे, शाळांचे मुख्याध्यापक, राजेंद्र आपुगडे, विक्रम भोसले, अविनाश लाड, राजू गेंजगे, शांताराम सुतार, सेवक उपस्थित होते.
यावेळी शाळांना पाठयपुस्तकांच्या सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर टाकणारा पाठयपुस्तक हा एक महत्वाचा घटक आहे. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या मराठी, उर्दू, सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमाच्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियाना अंतर्गंत दरवर्षी मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात येते. पाठयपुस्तके विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.