
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वर्गीय डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ २४ व २५ सप्टेंबर २०२२ रोजी मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर होत असल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शितल पाटील, मार्गदर्शक गिरीश कर्नावट यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. राज लाला यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होत आहे. कदमवाडी येथील डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे दोन्ही दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शिबिर होणार आहे.
भारतीय जैन संघटना कोल्हापूर, डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, जैन डॉक्टर फेडरेशन कोल्हापूर, डॉ. शितल पाटील फाउंडेशन, कृष्णा डायग्नेस्टिक प्रा.लि.व बीएमटेक यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूप व्रण, डाग यासह नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यांमधील विकृती यासंबंधीच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी २४ सप्टेंबरपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिरासाठी भारतीय जैन संघटना कैलास टॉवर बसंत बहार टॉकीज रोड, संघवी हॉस्पिटल भवानी मंडप आणि डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी या ठिकाणी नाव नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉ. वैशाली गायकवाड, अजित पाटील, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष प्रा. महावीर कित्तुर, राजकुमार शहा उपस्थित होते.