माजी नगरसेवक अजित राऊत यांचे निधन
schedule02 Sep 24 person by visibility 369 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी नगरसेवक व शिवाजी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष अजित विश्वास राऊत यांचे सोमवारी (२ सप्टेंबर) निधन झाले. धडाडीचा कार्यकर्ता हरपला अशा शब्दांत शिवाजी पेठेसह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.पिंटू राऊत म्हणून ते परिचित होते.
वेताळमाळ तालीम मंडळाचे आधारस्तंभ होते. शहरातील विविध संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी पद्माराजे उद्यान प्रभागातून महापालिकेवर नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले. अपक्ष म्हणून ते निवडून आले होते. महापालिकेत ते अडीच वर्षे विरोधी पक्षनेते, दोन वर्षे सभागृह नेता होते. तसेच स्थायी समिती सदस्य होते. त्या काळात ते, मंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय कोरे यांचे विश्वासू म्हणून महापालिका राजकारणात सक्रिय होते. महापालिकेतर्फे बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही ते काही वर्षे सक्रिय होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी माजी महापौर सुनीता राऊत, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.