कृष्णराज महाडिकांच्या पुढाकारातून फुटबॉल संघाचा स्नेहमेळावा
schedule16 Mar 24 person by visibility 350 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील फुटबॉल् संघ व खेळाडू यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. खासदार धनंजय महाडिक आणि युथ आयकॉन महाडिक यांनी मनमोकळा संवाद साधला. फुटबॉल खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देण्याची खासदार महाडिक यांनी ग्वाही दिली.
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी गेल्या २ वर्षापासून फुटबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, दरवर्षी के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. कोल्हापूर शहरातील फुटबॉलपटूंच्या अनेक समस्या आहेत. त्या जाणून घेवून, खेळाडू आणि फुटबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी महाडिक यांनी, या स्नेह मेळाव्याचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन केले होते. त्यासाठी पंचगंगा नदी जवळील गुरूकृपा कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
मँचेस्टर सिटी या जगप्रसिध्द फुटबॉल क्लबच्या खेळाडूंचे खेळण्याचे तंत्र, तिथले स्टेडियम, खेळाडूंना मिळणार्या सेवा सुविधा, सरावाचे तंत्र, अपघातानंतर खेळाडूंसाठीच्या वैद्यकीय सुविधा, याविषयी माहिती देणारी चित्रफित सादर झाली. यावेळी यूथ आयकॉन महाडिक यांनी कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. केवळ मैदान, प्रशिक्षक आणि चांगला आहार एवढयावर न थांबता, तर फुटबॉल खेळाडूंना चांगले मानधन मिळेल, यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.