सोयीच्या बदलीसाठीची बोगसगिरी महागात, तेरा शिक्षक निलंबित !
schedule08 Jan 26 person by visibility 188 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी चुकीची दिव्यांग प्रमाणपत्रे सादर कररणाऱ्या तेरा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या सूचनेनुसार गुरुवारी, आठ जानेवारी २०२६ रोजी संबंधित शिक्षकांना निलंबनाचे आदेश लागू झाले. यामध्ये शिरोळ, हातकणंगले, भुदरगड, राधानगरी, कागल आणि करवीर तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे. सोयीच्या बदलीसाठी जिल्हा परिषदेतील २६ शिक्षकांनी, दिव्यांग व आजार प्रमाणपत्रे खोटी सादर केल्याचे समोर आले आहे. बदली प्रकरणात घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षकांच्या दिव्यांग व आजार प्रमाणपत्रांची पडताळणी केली. ३५५ शिक्षकांपैकी ३२० शिक्षकांचे अहवाल योग्य आले. तर ५३ शिक्षकांच्या प्रमाणपत्राविषयी साशंकता होती. या साऱ्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी केल्यावर एकूण २६ शिक्षकांनी बोगसगिरी केल्याचे स्पष्ट झाले. यापैकी चार शिक्षकांना नोव्हेंबर २०२५ मध्ये निलंबित केले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेकडे आणखी १८ शिक्षकांचे अहवाल मिळाले. त्यामध्ये चौघांनी दिलेले खुलासे जिल्हा परिषदेने मान्य केले तर एका शिक्षकाचा अहवाल पुन्हा सीपीआरला तपासणीसाठी पाठविला आहे. उर्वरित १३ शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचे तपासात उघडीकस आले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.
……………