पन्हाळगडावर उभारणार शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, कोल्हापूरच्या शिल्पकारांकडे काम
schedule07 Oct 24 person by visibility 570 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
किल्ले पन्हाळगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. सरकारच्या धोरणानुसार पुतळ्यासाठी निधीची तरतूद नसल्यामुळे पुतळ्याच्या उभारणीसाठी २५ लाख रुपयांचा निधी नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनकडून दिला जाणार आहे. हा धनादेश मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शिल्पकार किशोर पुरेकर यांना प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील छत्रपती श्रीमंत ताराराणी सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी मुश्रीफ म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीतपावन झालेला किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळगड. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नाही, याची मनाला सतत टोचणी होती. वर्षभरापूर्वी पालकमंत्री एका कार्यक्रमानिमित्त गेलो असता पंचायत समितीच्या बाजूलाच असलेल्या शिवजीर्थ उद्यानातील अर्धपुतळ्याला अभिवादन केले आणि पूर्णाकृती पुतळा नसल्याची खंत व्यक्त केली. त्याचवेळी निर्धार केला की, लवकरच किल्ले पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करू.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महापालिकेच्या मुख्याधिकारी के. मंजूलक्ष्मी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, नितीन दिंडे, प्रा. मधुकर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.