महाराणी ताराराणींच्या जीवनकर्तृत्वावर चित्रमय चरित्र ग्रंथ निर्मिती
schedule28 Nov 26 person by visibility 8 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन: मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्ववान चरित्रावर चित्रमय चरित्र ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित वसुंधरा वसंतराव सावंतणव डॉ. देविकाराणी विजयमाला शिवाजीराव पाटील यांनी ही ग्रंथ निर्मिती केली आहे.
श्री शिवछत्रपतींची स्नुषा, सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या, राजाराम छत्रपतींच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याचे युद्धनेतृत्व हातात घेतले. दिल्लीपती औरंगजेबाला नमवायचे अशी उमेद धरून त्या रणमैदानात उतरल्या. सह्याद्री आणि सह्याद्रीतील मराठ्यांच्या ताब्यातील दुर्गांच्या साह्याने सलग सात वर्षांचा जीवघेणा संघर्ष करून त्यांनी औरंगजेबाला हतबल केले. आणि १७०७ मध्ये मराठ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीपती औरंगजेबाचा पराभव केला. स्वतः युद्धभूमीवर जाऊन युद्धसंचालन करत होत्या, त्यांनी मोगल सुभेदाराचा युद्धभूमीवर पराभव केला. त्यांच्या संदर्भातील सगळे ऐतिहासिक कागदपत्रे ही इंद्रजीत सावंत व देविकाराणी पाटील यांनी अभ्यासली.
या चरित्र ग्रंथाची निर्मिती करताना कोल्हापुरातील नामवंत चित्रकारांना हाताशी धरून ताराबाईसाहेबांचे चरित्र एका वेगळ्या स्वरूपात लोकांसमोर आणायचे ठरवले. चित्रतपस्वी आबालाल रहिमान, एम. व्ही. धुरंधर, बाबुराव पेंटर, माधवराव बागल अशा ओल्ड मास्टर्सनी काढलेली अनेक दुर्मिळ चित्रे जमा केली. सावंत व पाटील यांनी गेली दोन वर्षे अखंडपणे ताराबाईसाहेबांच्या जीवनातील अनेक चित्रे काढून घेतलीत, अनेक दुर्मिळ वस्तू, वास्तू यांची छायाचित्रे काढून घेतली, दुर्मिळ कागदपत्रांचा शोध घेणे, या सर्व गोष्टींवर संगणकीय संस्कार करणे, अशा मोठ्या प्रक्रियेतून हा ग्रंथ तयार झाला आहे.
तब्बल ८६ वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या या महान पराक्रमी मराठ्यांच्या महाराणीचे चरित्र लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न या ग्रंथातून साकार झाला आहे.या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ ५ डिसेंबर २०२६ शनिवार रोजी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित केला आहे.