कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे शोकसभा, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना श्रद्धांजली
schedule22 Apr 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्यावतीने ज प्राध्यापक व परिवर्तनवादी विचारवंत डॉ. श्रीकृष्ण शंकर महाजन यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवर, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी, “डॉ. महाजन यांच्या रूपाने आपण एक अभ्यासू, प्रामाणिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना दिशा देत राहील.” त्यांनी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दीर्घकाळ अध्यापन करत विद्यार्थ्यांना घडविल्याचेही नमूद केले.
डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी म्हणाल्या, “डॉ. महाजन यांचे व्यक्तिमत्त्व हे ज्ञान, प्रामाणिकता आणि समाजभान यांचा संगम होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी आहे.”यावेळी प्रा. एम. पी. वंडकर, प्रा. दिंडे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.महाजन हे प्राध्यापक, संशोधक, कवी, वैचारिक लेखक व प्रभावी वक्ते म्हणून परिचित होते. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.