मुख्यमंत्री महोदय, कोल्हापूरला कोणी वाली आहे की नाही ? शिवसेना ठाकरे गटाचा सवाल
schedule20 Aug 24 person by visibility 327 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खराब रस्ते प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटातर्फे निदर्शने करण्यात आली. रंकाळा चौपाटी येथील जाऊळाचा बाल गणेश मंदिर चौकात मंगळवारी दुपारी आंदोलन झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
" कुठला निधी कुठला विकास... टक्केवारीत कोल्हापूर झाले भकास, मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरला कोणी वाली आहे की नाही" या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. कार्यकर्त्यांनी, " रस्ते कामात कमिशन खाणाऱ्यांचा निषेध असो, कोल्हापुरातील रस्ते दर्जेदार झालेच पाहिजेत, रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे प्रशासनाचा धिक्कार असो, खराब रस्ते दुरुस्त होणार कधी, सरकार करतंय काय ? सरकार आणि प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय " कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुरेश चौगुले, महिला संघटक स्मिता मांढरे सावंत, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर कमलाकर जगदाळे, राजू यादव, रणजीत आयरेकर, मनजीत माने, महेश उतुरे, धनाजी दळवी, विशाल देवकुळे, शुभांगी पोवार पूनम फडतरे, रीमा देशपांडे, दिपाली शिंदे, सागर साळोखे आदींचा सहभाग होता. शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, सरकारकडून रस्ते दुरुस्तीसाठी शेकडो कोटींचा निधी दिला अशी वल्गना केले जाते. शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. मग हा निधी कोणाच्या खिशात जात आहे? "