लाचखोर वकिलाला सीबीआयने पकडले, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई
schedule11 Dec 24 person by visibility 4771 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लाचखोर प्रकरणी सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी संयुक्तपणे कोल्हापुरात कारवाई केली. इचलकरंजी येथे मंगळवारी (दहा डिसेंबर) ही कारवाई झाली. यामध्ये इंडियन बँकेचा कायदा सल्लागार अॅड. विजय पाटणकर यांना अटक झाली. थकिक कर्जापोटी बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अडीच लाखाची मागणी वकील पाटणकर यांनी केली होती. त्यापैकी एक लाख 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटणकर यांना रंगेहाथ पकडले.
यासंबधी अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने इंडियन बँकेच्या इचलकरंजी शाखेकडून कर्ज घेतले होते. तक्रारदाराकडून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. कर्ज थकीत असल्यामुळे त्यांच्या घरावर जप्प्तीची कारवाई करण्याची नोटीस बँकेने धाडली होती. या कालावधीत घरी मंगल कार्यालय आहे, यामुळे जप्तीची कारवाई पुढे ढकलावी अशी विनंती तक्रारदाराने केली होती. बँकेचे कायदा सल्लागार म्हणून वकील पाटणकर यांच्याकडे तक्रारदारने यासंबंधी विनंती केली. वकील पाटणकरने ही कारवाई पुढे ढकलण्यासाठी तक्रारदारांकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी एक लाख 70 हजार रुपयावर तडजोड झाली.
दरम्यानच्या कालावधीत तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. यातील लाच मागणारा व्यक्ती हा राष्ट्रीयकृत बँकेचा कायदा सल्लागार आहे. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथील सीबीआयच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. सीबीआय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तपणे तक्रारीची पडताळणी केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर मंगळवारी सापळा लावला. यावेळी लाचेची रक्कम घेताना अॅड. पाटणकरला रंगेहाथ पकडले.यातील लाचखोर हा राष्ट्रीयकृत बँकेचा सल्लागार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून होणार आहे .