महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : "पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणारे लोकमत कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले यांना यंदाचा भाई माधवराव बागल पुरस्कार जाहीर झाला आहे. '’ अशी माहिती भाई माधवराव बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य टी. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२८ मे २०२३ रोजी दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३० वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे. रोख पाच हजार रुपये, शाल, फेटा, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. परिवर्तनवादी चळवळ, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल बागल विद्यापीठातर्फे १९९२ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. भाई माधवराव बागल यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने यंदाचा (२०२३) पुरस्कार वितरण सोहळा २८ मे रोजी होत आहे. "वसंत भोसले यांची पत्रकार ते संपादक अशी कारकीर्द वाखाण्याजोगे आहे निर्भीड पत्रकार-संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. पत्रकारितेतील त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून भाई माधवराव बागल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे." असे प्राचार्य पाटील यांनी सांगितले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला बागल विद्यापीठाचे निमंत्रित व विश्वस्त व्यंकाप्पा भोसले, संभाजी जगदाळे, अनिल घाटगे, नामदेवराव कांबळे, जितेंद्र कांबळे, शंकर काटाळे उपस्थित होते.