काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपचे टीकास्त्र
schedule28 Aug 24 person by visibility 367 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील खराब रस्ताप्रकरणी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी कोल्हापू शहरातील ८१ प्रभागात आंदोलन झाले. खराब रस्त्यावरुन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या विरोधात निदर्शने केली. तसेच महायुती सरकारचा धिक्कारही केला. दरम्यान काँग्रेसच्या या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम यांनी पत्रकात म्हटले आहे, ‘ सलग अठरा वर्षे कोल्हापूर शहरातून आमदार, मागील पंधरा वर्षे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता, शहरातील दोन्ही आमदार स्वतःचे, स्वतः अठरा वर्षे आमदार व साडेसात वर्षे मंत्री व पालकमंत्री इतके सगळे असताना कोल्हापूर शहराला आमदार सतेज पाटील यांच्याकडून कोल्हापूरला काही मिळाले नाही. खड्डेमुक्त करण्याच्या नावाखाली आमदार पाटील यांनी सत्तेत असताना ३५ कोटी रुपयांचा निधी आणला होता, त्या निधीचे काय झाले ? आता त्यांनी नवीन ५० कोटी रुपये मागितले आहेत त्याऐवजी त्यांनी दोन्ही आमदारांचा व स्वतःचा विकासनिधी का वापरत नाहीत याचेही उत्तर कोल्हापूरच्या जनतेला द्यावे. ”
भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी म्हटले आहे, ‘कॉंग्रेसचे खड्डेमुक्त आंदोलन म्हणजे शेत खाल्लेल्या कुंपणाने केलेला कांगावा आहे. ज्यांनी कोल्हापूर वासीयांना खड्यात घातले तेच आज खड्यांसाठी आंदोलन करत असल्याचे हे चित्र म्हणावे लागेल. गेली पंधरा वर्षे महापालिकेत ज्यांची सत्ता आहे त्यांना आज अचानक खड्ड्यांची आठवण का आली असा सवाल उपस्थित होत आहे.
काँगेसचे तीन आमदार कोल्हापूर शहरातील रहिवासी आहेत असे असूनही त्यांनी आजपर्यंत रस्त्यां विषयात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. रस्त्याच्या विषयात आंदोलन करताना काँग्रेस ही गोष्ट विसरत आहे की कोल्हापूरच्या शहरवासीयांवर टोलचे भूत याच काँग्रेसच्या माध्यमातून लादण्यात आले होते.’
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर व विजय खाडे-पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, ‘रस्त्याच्या स्थितीबद्दल काँग्रेसने आंदोलन करणे हास्यास्पद आहे. ज्या काँग्रेसने वर्षानुवर्षे महानगरपालिका ताब्यात ठेवली, ज्या काँग्रेसच्या नेत्यांचे बगलबच्चे वर्षानुवर्षे महानगरपालिकेचे कारभारी म्हणून बसून राहिले, कोल्हापूरच्या विकासात कोणतेही भरीव योगदान दिले नाही आणि ज्या काँग्रेसचे जवळचे ठेकेदार शहरातील रस्त्यांची बहुतेक सगळी कामे करतात त्या काँग्रेसला रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल आंदोलने करायची नैतिकता आहे का ? हे आंदोलन हास्यास्पद आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी केले आहे अशी टीका त्यांनी केली.