जल दिनानिमित्त बुधवारी हर घर जल ग्रामपंचायतींची घोषणा
schedule21 Mar 23 person by visibility 868 categoryजिल्हा परिषद

जलदिनानिमित्त ग्रामसभांमध्ये होणार ठराव : संजयसिंह चव्हाण
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
२२ मार्च २०२३ रोजी जागतिक जलदिनानिमीत्त ग्रामसभेची बैठक घेऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने त्यांच्या पाणी आणि स्वच्छता स्थितीचा विचार करून हर घर जल किंवा हागणदारीमुक्त अधिक (ODF +) दर्जा प्राप्त केल्याबाबतचा, ठराव करण्यात येणार आहे. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
ग्रामीण स्वच्छता शाश्वता टिकवण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंर्तगत ग्रामीण लोकाचा सहभाग व जनजागृती करून ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाची उपलब्धता करून देणे तसेच आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन याबाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कार्यवाही करून ज्या गावांनी घन कचरा किंवा द्रव कचरा सांडपाणी व्यवस्थापन पूर्ण केले आहे, त्यांनी त्यांच्या ग्रामसभेत स्वतःला हागणदारीमुक्त अधिक (ODF +) घोषित करणारा ठराव केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे, जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा आणि अंगणवाडी सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणी देणे आवश्यक आहे. त्यांनतर अशी गावे हर घर जल म्हणुन घोषित करण्यात येणार आहे. अशा ग्रामपंचायतींनी ग्राम सभा घेऊन हर घर जल ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.
दरम्यान पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव म्हणाले "जागतिक जल दिन निमित्ताने बुधवारी ग्रामपंचायत स्तरावर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय येथे जल प्रतिज्ञा घेणेत येणार आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची तपासणी प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे, जलस्त्रोत परिसर स्वच्छता व पाणी साठवण टाकी सफाई मोहिम ही राबविण्यात येणार आहे. गृहभेटी दरम्यान घरगुती पिण्याच्या पाण्याची साठवण, हाताळणी, पाणी अशुध्द होण्याची कारणे याबाबत माहिती ग्रामस्थाना देणेत येणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन केले जाणार आहे. "