एआय मुळे जग बदलेल , बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे - आयटी शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत
schedule08 Aug 26 person by visibility 40 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण, उद्योग, संशोधन आणि दैनंदिन जीवनात प्रभाव वाढत आहे. शैक्षणिक क्षेत्रात ‘ए.आय.’ च्या प्रभावाने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा. तसेच “ए.आय. माणसाची जागा घेणार नाही; मात्र ‘एआय’चा प्रभावी वापर करणारा माणूस ‘ए.आय.’ चा वापर न करणाऱ्या माणसाची जागा घेऊ शकतो.’असे मत आयटी शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३९ वा स्मृतिदिन कार्यक्रम रविवारी ९ ऑगस्ट २०२६ रोजी झाला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी माझी झी शाळा - सर्वोत्कृष्ठ् शाळा पुरस्कार सन २०२४-२५ सिध्दनाथ हायस्कूल, आरवडे यांना व २०२५- २६ चा पुरस्कार छत्रपती शिवाजी हायस्कूल, भोर यांना प्रत्येकी रोख दोन लाख रुपये व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
सावंत यांनी ‘ए.आय. आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले.‘ शिक्षण, तंत्रज्ञान आणि मूल्याधिष्ठित समाजनिर्मिती या ध्येयाने प्रेरित होऊन शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी मोलाचे कार्य केले आहे. ‘असे सावंत यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी, ‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या शिक्षणविचारांचा वारसा जपण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच ‘ए.आय.’ मुळे माणसातील सृजनशीलता, भावनिकता कमी होणार नाही याची काळजी घ्यावी.’ असे विचार मांडले.
यावेळी संस्थेतील ‘माझी शाळा सर्वोत्कृष्ट शाळा’ विभागीय पुरस्कार २०२६, डॉ. आप्पासाहेब पवार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, स्वामी विवेकानंद विवेकरत्न गुरुदेव पुरस्कार, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे उत्कृष्ट लेखनिक पुरस्कार, भारतरत्न डॉ.सी.व्ही.रमण क्रियाशील प्रयोगशाळा सहायक परिचर पुरस्कार, डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी संस्थेच्या मिरज शाखेतील विद्यार्थी देवांश गुरव आणि राजे विजयसिंह डफळे हायस्कूल,डफळापूरचे कला शिक्षक शरद शंकर कांबळे यांनी स्वामी विवेकानंद, डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे हस्तशिल्प तयार केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल,कोल्हापूर येथील विद्यार्थी गोविंद बाबुराव गावडे याने सलग तबला वादनात विश्वविक्रम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गायक महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे प्रभारी सचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुप्रिया पाटील व डॉ. कविता तिवडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या प्रशासन विभागाचे सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव कांबळे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, उपस्थित होते.