थोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायिनी, केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता
schedule07 Aug 26 person by visibility 26 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणजेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय. सीपीआर ही गोरगरिबांची आरोग्यदायिनी आहे तर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ही कोल्हापूर शहराची अस्मिता आहे. रविवारी ९ ऑगस्ट रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती येत आहे. त्याच दिवशी या नूतनिकृत केलेल्या दिमाखदार वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. हा मोठा सुवर्णयोगच आहे. अवघ्या दोन वर्षाच्या आतच ही वास्तु पूर्ण झाली. या कामांमध्ये हातभार लावू शकलो याचे मला फार मोठे समाधान आहे आणि ते मी माझे भाग्य समजतो.’ असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
नूतनीकरण केलेल्या या दोन्ही वास्तूंचे लोकार्पण मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, ९ ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे व प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील सभा स्थळाला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआरच्या नूतनीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमाबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, थोरला दवाखाना म्हणून लौकिक असलेल्या सीपीआर हा गोरगरिबांची आरोग्यदायिनी आहे. या दवाखान्याचे ६०० हून अधिक कोटी निधी खर्च करून नूतनीकरण केलेले आहे. रुग्णांसाठी सर्व अत्यावश्यक व्यवस्था सीपीआरमध्ये निर्माण केलेल्या आहेत. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद करून अतिशय योग्य काम केलेले आहे. जेन झी, अल्फा या पिढ्यांशी कनेक्ट होण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलेले आहे की, यामध्ये जेन झीची काही चूक नाही, त्यांना समजून घेण्यात आपलीच चूक झालेली आहे.