विद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !
schedule06 Aug 26 person by visibility 41 categoryशैक्षणिक
विद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप! !
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ राजकीय अड्डा करू नका, जर एखाद्या विशिष्ट संघटनेचा विद्यापीठात कार्यक्रम होणार असेल तर येत्या कालावधीत मनसे – शिवसेना ठाकरे पक्ष - संविधान युवा प्रतिष्ठानतर्फेही कार्यक्रम घेतला जाईल, आणि विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली तर आंदोलन करू असा इशारा संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विभागात गुरुवारी गोलमेज परिषद आयोजित केले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे फलक होता. त्या फलकावर विद्यापीठ, विकास मंच व अभाविपचा लोगो होता. ‘विद्यार्थ्यांची उपस्थिती, वास्तव आव्हाने आणि उपाययोजना’असा परिषदेचा विषय होता. या कार्यक्रमासाठी अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटमंत्री देवदत्त जोशी, शिक्षण सहसंचालक प्रकाश बच्छाव हे प्रमुख अतिथी होते. कुलगुरू डॉ. आर. के. कामत हे अध्यक्ष तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सिद्धार्थ शिंदे यांची उपस्थिती दर्शविणारा फलक व्यासपीठावर होता. अभाविपचे महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील गुरव, व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. स्वागत परुळेकर यांनी संयोजन केले होते.
दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख मंजित माने, मनसे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अभिजित राऊत, मनसे विद्यार्थी शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे, संविधान सन्मानचे निलेश बनसोडे, विकी कांबळे, गौरव कांबळे आदींनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला. त्यांनी कुलगरू कामत व अधिकार मंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भारतीय जनता पार्टीची एक यूथ विंग आहे, हा कार्यक्रम घेत असताना कोणत्याही विद्यार्थी संघटनांना आयोजकांनी आमंत्रण केलं नव्हते, यावरून स्पष्ट दिसून येते की शिवाजी विद्यापीठात विशेष पक्षाचा राजकीय अड्डा सुरू आहे.’या मंडळींनी केला. तसेच त्यांनी संबंधित कार्यक्रमाच्या निमंत्रित पत्रिकेबाबत कुलगुरू कामत यांच्याकडे विचारणा केली. त्या पत्रिकेबाबत मला कोणतीही माहिती नाही असे उत्तर कुलगुरूंच्या माध्यमातून देण्यात आले. दरम्यान याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसानी हस्तक्षेप केला. दरम्यान संघटना प्रतिनिधींनी, येत्या काही दिवसात शिवाजी विद्यापीठ व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व मनसेचे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे, व संवेद विद्यार्थी संघटनेचे सुजात आंबेडकर यांना घेऊन विद्यार्थी हिताचा कार्यक्रम केला जाईल असे सांगितले.
………………………………………………