बचत गटांच्या वस्तूंचे दसरा चौकात तीन दिवस प्रदर्शन
schedule16 Mar 23 person by visibility 739 categoryलाइफस्टाइल
प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या उत्पाादनांचे १७ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत दसरा चौक मैदान, कोल्हापूर येथे प्रदर्शन व विक्री होणार आहे. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
प्रदर्शनामध्ये एकूण ११० बचत गटांचे स्टाँल लावण्यात येणार आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ यांचा समावेश असेल. यामध्ये कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी चप्पल, विविध प्रकारचे तांदूळ, पापड, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, बांबूच्या विविध वस्तू, गारमेंट, तृणधान्य महत्व सर्वसामान्य पर्यंत पोहचावे याकरिता ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणी युक्त पदार्थ,राजगिरा याचे स्वतंत्र स्टाँल लावण्यात येणार आहेत तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करुन विक्रीकरिता ठेवण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते होणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण प्रमुख उपस्थित राहणार आहेत. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव, विभागीय कृषी व पणन विभागाचे विभागीय सरव्यवस्थापक डॉ सुभाष घुले, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.