गावोगावी एक तारीख -एक तास स्वच्छता श्रमदान उपक्रम
schedule28 Sep 23 person by visibility 1018 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत अंतर्गत गावोगावी आणि गावातील प्रत्येक कुटूंबापर्यंत स्वच्छतेचे महत्व पटवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास) असा उपक्रम एक ऑक्टोबर २०२३ रोजी सर्व ग्रामपंचायींमध्ये सकाळी दहा वाजता स्वच्छता श्रमदान करुन राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, महीला बचत गट, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या संख्येन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त दोन ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागातून एक तास श्रमदानाव्दारे स्वच्छता करण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्याकरिता ग्रामपंचायती अंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वे लाईन, बस स्थानके, विमानतळ, राष्ट्रीय / राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, जलस्त्रोत, नदीघाट, झोपडपट्ट्या, पुलाखालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खासगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोलनाके, प्राणी संग्रालय, गो शाळा डोंगर, रहिवासी क्षेत्र, आरोग्य संस्था, आसपासचा परिसर, आंगणवाडी परिसर, शाळा व महाविद्यालय परिसर तसेच या क्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाण अशा ठिकाणांची निवड करण्यात येणार आहे.
श्रमदान उपक्रमावेळी मी माझा कचरा उघड्यावर फेकणार नाही, त्याची योग्य विल्हेवाट लावेन, मी माझ्या घरातील सांडपाणी उघड्यावर सोडणार नाही, त्यासाठी घराच्या शेजारी शोष खड्डा करेन, मी माझ्या शौचालयाचा नियमित वापर करेन आणि स्वच्छ ठेवेन अशा प्रकारच्या प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी दिली.
गावातील स्वच्छता श्रमदान करावयाच्या ठिकाणांची माहिती केंद्र शासनाच्या https: //swachhatahiseva. com या पोर्टल वर भरण्यात आली असून एक ऑक्टोबर २०२३ रोजी राबविलेल्या उपक्रमाचे फोटो या पोर्टलला अपलोड करण्यात येणार आहेत.