महापालिकेत खळबळ, नेत्रदीप सरनोबतांची उचलबांगडी ! शहर अभियंतापदी हर्षजीत घाटगे !!
schedule28 Mar 23 person by visibility 558 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या कारणावरून त्यांच्यावरही कारवाई झाली. उप अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे महानगरपालिकेचा शहर अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर सरनोबत त्यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचा जल अभियंता पदाचा कार्यभार दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे हे काही दिवसापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यावरून नाराजी व्यक्त केली होती. राज्य शासन कोल्हापूर शहरातील रस्त्यांना निधी देत असेल तर रस्ते दर्जेदार असायला हवेत अशी भूमिका श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे केली. तसेच कोल्हापूर शहरातील खराब रस्त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहरातील खराब रस्त्याला महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत, शहर अभियंता यांच्याकडे रस्ते दुरुस्तीची जबाबदारी असते. तेंव्हा शहर अभियंताना जबाबदार धरून कारवाई व्हावी अशी सूचना ही खासदार शिंदे यांनी केली होती. यानंतर गतीने हालचाली झाल्या.
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न नेहमीच गाजत असतो. राज नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही काही महिनापूर्वी शहर अभियंता सर्व त्यांच्या कामकाजाविषयी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी सरनोबत यांना सूचना करण्यात आल्या होत्या. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांच्या कोल्हापूर दौरा वेळी खराब रस्त्याचा विषय पुन्हा उद्भवला आणि सरनोबत यांच्यावर कारवाई झाली.