पंचगंगा नदी मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या ! पंकजा मुंडेंचा सवाल
schedule26 Dec 24 person by visibility 46 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘ पंचगंगा नदी दिवसेंदिवस मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या? असा सवाल मुंडे यांनी केला. नदीकाठच्या गावांमध्ये तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत तसेच कारखानदार, उद्योजक,कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांच्यासोबत व्यापक बैठक घेऊन पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा कृती आराखडा तयार करावा”अशा सूचना पर्यावरण आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केल्या.
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुंडे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
दुपारी त्यांनी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला कोल्हापूर शहरातील प्रमुख उद्योजकांचीही उपस्थिती होती. या बैठकीमध्ये पंचगंगेच्या वाढत्या प्रदूषणावर चर्चा झाली. नदीकाठावरच्या गावांमधून तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका क्षेत्रातून दररोज लाखो लिटर सांडपाणी विना प्रक्रिया पंचगंगेत मिसळत आहे. त्यासोबत नदीकाठावर कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. दोन्ही महापालिकांची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. मंत्रालय स्तरावरून या आराखड्यास मंजुरी दिली जाईल पण पावसाळ्यापूर्वी पंचगंगा शुद्धीकरणाचे काम सुरू झाले पाहिजे अशा सूचना मुंडे यांनी केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडील रिक्त पदांचा आढावा मुंडे यांनी घेतला. रिक्त पदांच्या भरतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावा असेही मुंडे म्हणाल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पशुधनाची संख्या जास्त आहे त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरली जातील असे आश्वासनही मुंडे यांनी दिले. बैठकीला आमदार अमल महाडिक यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.